फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे
येत्या शुक्रवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक वास्तूंवर सखोल संशोधन करून इतिहासाचा मागोवा घेणारे इतिहासतज्ज्ञ सदाशिव टेटवीकर यांनी गोमंतक फिरंगाण आणि शिवाजी महाराज यावर केलेले बोलके भाष्य.
मायमराठीची अस्मिता, परकीय आक्रमणांविरुद्ध आक्रमकता, हिंदुस्थानचा राष्ट्राभिमान . . . याची तेजस्वी शिकवण सुमारे तीनशे वर्षांपूर्वी शिवाजीराजांनी दिली होती. गोमंतकाच्या इतिहासातही छत्रपतींनी फिरंग्यांविरोधात जो विचार मांडला तो आजही प्रेरणा देतो.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शंभर-सव्वाशे वर्षे आधी तत्कालीन अत्याधुनिक शस्त्रसज्ज जहाजे घेऊन हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या वास्को-डी-गामा नंतर आलेल्या अल्बुकर्क याने सागर व खाडीकिना-यावरील प्रदेश जिंकून घेऊन गोमंतक येथे पोर्तुगीज राजवटीचा पाया घातला. पुढील शंभर वर्षांत जेवढ म्हणून इथला भूभाग ताब्यात आला तेवढ्या प्रदेशातील एतद्देशियांची मंदिरे, प्रार्थनास्थळांचा नाश करून त्या जागेवर पोर्तुगीजांनी चर्च उभी केली व साम, दाम, दंडाचा उपयोग करून सर्वत्र ख्रिस्तीकरण केले. या ख्रिस्तीकरण केलेल्या भागाला फिरंगाण म्हणण्याची प्रथा मराठेशाहीत रूढ झाली. या फिरंगाणामुळे गोमंतक किंवा गोव्याचे तेव्हा दोन भाग पडले होते. समुद्रकिना-यापासून दूर जंगलातील डोंगराळ भागात किंवा सह्याद्रीच्या कुशीतील डिचोली, सत्तरी, मणेरी, फोंडा या भागात हिंदू तर किना-यावरील भागात पोर्तुगीज व बाटगे ख्रिश्चन म्हणजे फिरंगी राहत होते.
शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांचे विळ्या-भोपळ्याचे वैर नव्हते. पोर्तुगीजांनी फक्त व्यापार-उदीम करावा. राज्यशकट चालविण्यासाठी त्याची आवश्यकता आहेच पण त्यांनी स्थानिकांच्या राजकारणात लुडबूड करू नये, एवढीच त्यांची रास्त अपेक्षा होती. शिवाजी महाराजांचा उदय ही हिंदुस्थानातील अतिशय महत्त्वाची आणि मोठी घटना होती. त्यांनी इ.स. १६५७ ते १६५९ या दरम्यात कल्याण, भिवंडी आणि विजयदुर्ग येथे जहाज बांधण्याचे कारखाने सुरू करून स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली आणि अल्पावधीत कल्याण, ठाणे, वसईपासून बसनूर तसेच कारवारपर्यंतच्या सागरावर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. शिवाजी महाराजांच्या या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि शिवाजी महाराजांशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. पुढे प्रसंगानुरूप अनेकवार तह झाले. ‘प्रतापगड युद्ध’, ‘पन्हाळगडाचा वेढा’, ‘सुरतेची दोनदा लूट’, ‘आग्र्याहून सुटका’ या शिवाजी महाराजांच्या अविश्वसनीय, अफाट आणि अचाट भीमपराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर युरोपमधील राष्ट्रेही अचंबित झाली आणि भारावून गेली होती. विजरई कोदी व सांव्हिसेंति याने पोर्तुगालच्या बादशहास लिहिलेल्या दिनांक २० सप्टेंबर १६६७ च्या पत्रात असा उल्लेख आहे की, ‘त्याची (शिवाजी महाराजांची) धूर्तता, शौर्य, चपळाई व युद्धविषयक दूरदृष्टी लक्षात घेता त्याची सीझर व सिकंदर यांच्याशी तूलना करता येईल. हा माणूस सर्वच ठिकाणी असतो व कोठेच त्याची अमुक एक जागा म्हणून नाही.’
शिवाजी महाराजांचा दरारा, त्यांच्याबद्दल वाटणारी आदरयुक्त भीती, कुतूहल यावर तत्कालीन प्रवासी व पाश्चात्त्यांनी भरभरून लिहिले आहे. त्यापैकीच एका पोर्तुगीज लेखकाने शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले आहे, हे ऐकायला अविश्वसनीय वाटले तरी खरे आहे. शिवाजी महाराजांच्या समकालीन, बहुधा गोव्यातील मुरगाव येथे राहिलेल्या या पोर्तुगीज कॅथलिक लेखकाचे नाव आहे, ‘कोस्मि द ग्वार्द’. इ.स. १६९५ साली त्याने हे पुस्तक लिहिले होते. गोवा आणि पोर्तुगालमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अनेक आख्यायिका व दंतकथा पसरल्या होत्या. त्या अगदीच काही बिनबुडाच्या नाहीत. त्यांना ऐतिहासिक आधार आहे.
इ.स. १६६७ साली शिवाजी महाराजांनी बारदेशावर स्वारी केली, त्याचे कारण होते विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध जेव्हा मोहीम उघडली तेव्हा वाडीचे सावंत, पेडणेचे नाईक व प्रभू आणि भतग्रामचे शेणवी हे शिवाजी महाराजांविरुद्ध लढले, पण त्यांचा पराभव होऊन त्यांनी गोव्याच्या पोर्तुगीजांचा आश्रय घेतला. वाडीचे सावंत-भोसले यांची शिवाजी महाराजांबरोबर दिलजमाई झाली. पण देसाई, प्रभू, नाईक, शेणवी पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेल्यामुळे शिवाजी महाराजांनी गोव्याच्या व्हॉईसरॉयला पत्र पाठवून देसाई, प्रभू, नाईक, शेणवी यांना आमच्या ताब्यात द्या म्हणून खडसावले. शिवाजी महाराजंचा वाढता प्रभाव पाहून पोर्तुगीजांनी इ.स. १६६८ साली देसाई, प्रभू, नाईक, शेणवी यांना पणजीतून हाकलून लावले. पुढे हे सर्वजण शिवाजी महाराजांना शरण जाऊन स्वराज्य कार्यात उतरले. त्यावेळी महाराजंचा मुक्काम डिचोलीत होता. या मोहिमेपूर्वी शिवाजी महाराज वेश पालटून डिचोलीत आले होते तेव्हाची दंतकथा प्रसिद्ध आहे.
डिचोली, भतग्राम, सतरी, फोंडा हे भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यावर नार्वे येथील श्रीसप्तकोटीश्वर देवालयाचा जीर्णोद्धार त्यांनी केल्याचा उल्लेख ‘श्री शिवराज्याभिषेक - कल्पतरू’ या निश्चलपुरीकृत शिवकालीन संस्कृत ग्रंथात मिळतो. शिवाय मंदिराच्या गर्भागाराच्या प्रवेशद्वारावर ‘श्री शिवराज्ञादेवालयस्य प्रारंभ’ या अक्षरांचा शिलालेख कोरलेला आहे. मंदिरावरील या शिलालेखात जीर्णोद्धाराची तारीख शके १५९०, कार्तिक बाहुल ५, सोमवार (दिनांक १३ नोव्हेंबर १६६८) अशी दिली आहे.
श्रीसप्तकोटीश्वर हे कदंब राजांचे कुलदैवत होते. प्रथम त्यांनी हे मंदिर दीपवती बेट (मांडवी नदीतील दीपाडीबेट) येथे बांधले होते. कदंबराजे मोठ्या अभिमानाने ‘श्रीसप्तकोटेश लब्ध वरवीरा’ हे बिरूद धारण करीत. राजा शिवचित्त कदंबा (इ.स. ११५५) याच्या नाण्यावर श्रीसप्तकोटीश्वराचे नाव कोरले आहे. अशा प्राचीन मंदिरावर दोनदा आक्रमण झाले. इ.स. १६६८ साली शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला सातशे होनांची नेमणूक करून दिली. अलीकडे इ.स. १९१० मध्ये मंदिराच्या कमानीवजा छपराला भेग पडल्यामुळे ते पाडून कौलारू छप्पर घालण्यात आले. मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे. गर्भगृहात पवित्र शिवलिंगाची स्थापना केली असून या शिवलिंगाला मुखलिंग असे म्हटले जाते. तर शिवमंदिरांपेक्षा श्रीसप्तकोटीश्वर मंदिरातील शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते सोने, रुपे, तांबे, लोखंड, जस्त आदि अष्टधातूंचे असून त्यावर महादेवाचे मुख कोरले आहे. ‘कोकण महात्म्य’ ग्रंथात याचे सुंदर वर्णन केले आहे.
गोमंतकातील वतनदार, सर्वसामान्य रयत आणि धर्मांतरित झालेल्या गोवेकर ख्रिस्ती समाजामध्ये स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली. कायतानु, फ्रांसिस्कु कौतुक, तुझे आंतानियु गोंसालिव्हश - इ.स. १७८७, दीपाजी राणे - इ.स. १८५२, कुष्टोबा - इ.स. १८७१ व त्यानंतर दादा राणे यांनी जुलमी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढा दिला. यामागे छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची प्रेरणा होती.
देव, देश, धर्मासाठी छत्रपती शिवरायांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर गोमंतकातही पवित्र भगवा ध्वज फडकावला. आपल्या अस्तित्वाची जाणीव शिवरायांनी दीव, दमण, गोवा या परिसरात करून दिली. त्याचे दस्तावेज, कथा, वास्तू हे आजही जागोजागी दिसतात. शिवरायांच्या राज्याभिषेक उत्सवाच्या निमित्ताने इतिहासाचे स्मरण करणे प्रत्येक मराठी हिंदूचे कर्तव्यच आहे.
(सामना दिनांक १६ जून २०१३ यांच्या सौजन्याने)