2015-11-04-06-34-26गोमांतकात ज्ञानेश्वरांच्‍या काळपर्यंत कदंब घराण्‍याचे राज्‍य होते. अनेक देवदेवतांची सुंदर सुंदर मंदिरे ठिकठिकाणी होती. गर्द झाडी, त्‍यातून खळाळणा-या...
7880
history-of-saptakotishwarThe Saptakotishwar Temple is one of the oldest and a very ancient temple in Goa. It is mentioned in ancient scriptures and the recorded history of the...
13020
2015-11-04-06-25-58फिरंगाण अन् छत्रपती शिवाजीराजे येत्‍या शुक्रवारी महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्‍याभिषेक दिन. दीव, दमण, गोवा येथील ऐतिहासिक...
8750
2015-11-04-06-21-41सप्‍तकोटीश्‍वर शिवछत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले गोव्‍यातील श्रीसप्‍तकोटीश्‍वर मंदिर पर्यटनाचा दिमाख मिरविणा-या गोव्‍यात अजूनही दुर्लक्षितच आहे....
6930
2012-02-13-06-36-35 फार पूर्व काळापासून बहुतेक सारस्वत ज्ञातीची मंडळी ही गोमंतकात म्हणजेच गोव्यात होती. इतरही जातीधर्माचे बांधव तेथे  वास्तव्य करून होते. त्याकाळातील...
24710

Login Form

नार्व्याचे मंदिर

shilalekh

गोव्याची सफर करणारे यात्रिक पणजी पाहतात, श्रीमंगेशाचे दर्शन घेतात. शांता दुर्गेच्या चरणी मस्तके लववितात. माशिळला जाऊन देवकीकृष्ण पाहून येतात. म्‍हाडदोळला म्‍हाळसेलास नमस्कार करतात. वेलिंगला जाऊन नृसिंहदर्शन करून येतात. फर्मागुडीला भाऊसाहेब दांडेकरांनी बांधलेले गोपाळ गणपतीचेही मंदिर पाहून येतात. नागेशीचं नागेशाचं दर्शन त्यांना चुकविता येत नाही. बांदोड्याच्या महालक्ष्‍मीचे दर्शनही त्यांना ध्यावे लागते.


 पण बहुधा या सर्वच पर्यटकांना थोडे आडबाजूला असल्यामुळेच की काय नार्व्याचे श्रीसप्तकोटीश्वर माहीत नसते. तसे पाहिले तर हे गोव्यातले सर्वात जुने देवस्थान. म्‍हणजे स्वतः श्रीकृष्णाने जेव्‍हा जरासंधाशी युद्ध आरंभिले, तेव्हा तो या दैवताचे दर्शन घेऊन गेला होता, असे पुराणात तरी वर्णन आहे.
 मूळचे हे मंदिर दिवाडी म्‍हणजे दीपवती बेटांत. कोकणमहात्म्यात वर्णन आहे

-
द्वीपपाड क्षेत्र महाथोर⃓ जेथे देव सप्तकोटेश्वर
वारवें राहिवास मंदिर⃓ स्थान  सप्तऋषींचे ⃓
सप्‍तधातूंचे लिंग म्हणती⃓ नवरत्नांची  ज्योती⃓
ऐसीनवल प्रभा स्थिती⃓ योजवेता भूषणाते⃓
    सप्तकोटीश्वराचे लिंग पाषाणाचे नाही. ते सप्तधातूंचे आहे. सप्तधातूंचे शिवलिंग अन्य  कोठेही नाही.
    जयकेशीनंतर दोन शतके हे श्री सप्तकोटीश्वर मंदिर मोठ्या ऐश्वर्याने दीपावती बेटात नांदले. पुढे  त्या  मंदिराचे दुर्दैव ओढवले. बहमनी सुलतान हसन गंगू याने कदंबांचा उच्छेद करून गोवा प्रांत जिंकला. तेव्हा इतर मंदिरांसवे सप्तकोटेश्वराचे मंदिरही  त्याने भ्रष्ट केले. शिवलिंग त्याने मुळासकट उपटून काढले. सोरटी सोमनाथाप्रमाणे इथेही शिवलिंगाखाली अमाप संपत्ती दडविलेली आहे, अशी त्याची धारणा. पण ती सफळ झाली नाही. तेव्‍हा त्याने आपला राग शिवलिंगावर काढला. ते लिंग त्याने बांधाच्या चिखलात फेकून दिले.
    पण त्याच्याशी अभिमान बाळगणारा कुणी एक जन्मलाच. विजयनगरच्या राज्याचा माधव मंत्री गोव्यात आला. त्याने गोवा मुसलमानांपासून मुक्त केला आणि पुनः मंदिराचा जीर्णोद्धार करून देवाची  प्रतिष्ठापना केली.
    पुनः दीडशे वर्षे देव आपल्या मंदिरात संपूर्ण वैभवाने नांदला. आता दुसरे मूर्तिभंजक जे पुर्तुगेज, त्यांनी गोवा घेतले. पुनः त्यांनी मंदिरावर घाला घातला. श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे जागी त्यांची चर्चची उभारणी केली आणि शिवलिंग एका विहीरीच्या पायठणीवर रोवले. ख्रिश्‍चन स्त्रिया रोज पाणी भरताना त्यावर पाय देऊ  लागल्या.
    बेटापलीकडे भतग्राम महाल होता. त्याचा कारभार सूर्यराव सरदेसाई यांच्याकडे होता. त्यांच्या स्वप्नात  महादेव आले. त्यांनी त्याला या शिवलिंगाची दुर्दशा सांगितली. त्यांनी गुप्त  रीतीने आपली माणसे बेटांत धाडली आणि त्यांचे हातून ते शिवलिंग एका रात्री हलविले. नार्वे गावी त्याची त्यांनी स्थापना केली.
    मात्र एकाच खडकात गर्भगृह कोरून, त्यात त्यांनी सप्तकोटीश्वराची प्रतिष्ठापना  केली. त्याच्या समोर एक अर्धवट उभारलेला मंडप होता. याहून अधिक मंदिराची  व्यवस्था देसाई करू शकले नाहीत आणि एक निष्ठावंत भक्त शंभर वर्षांनी देवाचे दर्शन करण्यासाठी आला. शककर्ते शिवराय डिचोली महाल काबीज करून डिचोलीला आले. श्रावणाचा महिना. दर सोमवारी महादेवाचे दर्शन करायचे असा शिवरायांचा परिपाठ होता. त्यांनी सप्तकोटीश्वराविषयी ऐकले. लगेच ते डिचोलीहून निघून नार्व्याला येऊन पोचले. तिथे त्यांनी सप्तकोटीश्वराचे दर्शन घेतले. ते धांतूमय शिवलिंग पाहून राजास अतिशय संतोष झाला. त्यांच्यासवे मोरोपंत होते. त्यांना देवालयाचा जीर्णोद्धार करावयास सांगितले. मोरोपंतांनी लगेच देवालयाचा सभामंडप बांधायला प्रारंभ केला.

 

आज एक उत्तम सभामंडप, गर्भागार, आंत ते धातुमय शिवलिंग, भवताली गडगा, समोर एक उत्तम बांधीव तलाव असे तेथील दर्शन आहे. हा सगळा परिसर माडाच्या झावळ्यांच्या  सावलीत विसावला आहे. शिवाजीराजांनी स्वतः आपले नांव कोरविलेले हे एकमेव स्थळ.
    मी गोव्यात पहिल्यांदा  गेलो,  तेव्हा निश्चय केला की श्रीसप्तकोटीश्वर बघायचे. जुन्या  गोव्यास जाऊन तिथून लांचीत बसून मी दिवाडी बेटावर गेलो. जिथे  सप्तकोटीश्वराचे देऊळ होते तिथे आज एक चर्च आहे. हे सतक्रुत्य पुर्तुगेजांचे, ते स्थळ मी  न्याहाळले. नंतर बेटाच्या  दुस-या अंगास जाऊन पुनः होडीतून नदी ओलांडून मी नार्व्यास पोहोचलो. नांव मी चुकत नसेन तर, भाटे नामक नार्व्याचा एक मित्र मजबरोबर होता. यांची नार्व्यास भली प्रशस्त बाग आहे. त्याने मला  आपल्याबरोबर मंदिराकडे नेले. आधी  त्याच्या अंगणात बसून कोकमीचे सरबत प्यायलो. नंतर तळात असलेले सप्तकोटीश्वराचे मंदिर त्याने दाखविले.
    अंगावर एक थरार उमटला. स्वतः शिवप्रभूंनी बांधिलेले हे मंदिर.
 भाट्यांना मी म्‍हणालो, “मला मंदिरा जाऊन शिवलिंग  प्रत्यक्ष पाहता येईल?”
ते म्हणाले, “समोरील पुष्करिणींत स्नान करून, मग ते शक्य आहे.”
काही नाही, मी त्या लिंगास मिठी मारली! कृतकृत्य झालो.
    त्यानंतर पुढील वेळी मी एक अघोचर केले. माझी आई अंबिकाबाई दांडेकर वयाच्या  ७५व्या वर्षी सौ. सुधाताई जोशांची पाठराखीण म्‍हणून गोव्यात सत्याग्रहास गेली होती. ती तळेगावी मजपाशी होती, तिचा अंतही तिथेच झाला. मी दहा-वीस गीतापाठी जमवून त्यांचेकडून गीता मोठ्याने वाचवून घेत तिचा अग्निसंस्कार केला.

वर्षश्राद्धाचे दिवशी रात्री पुनः गोव्यास आलो. नार्व्यास गेलो. भाटे यांस सांगून एक शचिर्भूत, पवित्र ब्राह्मण शोधून काढला. त्याचेकडून श्री सप्तकोटीश्वरासमोरील जलाशयात आईचे हिरण्यश्राद्ध करविले. म्‍हटले, “आई गे, तूं जिथे कुठे असशील, तिथून बघत असशील, की तूं ज्या भूमीसाठी कांही केलेय, वयाच्या ऐन उतरत्या काळींही केलेस, त्यागोव्यात शिवछत्रपतींनी स्थापिलेल्या सप्तकोटीश्वरांसमोर तुझें हे श्राद्ध मी करीत आहे!” तिचा आत्मा सप्तकोटीश्वरा तिथे कुठे असेल, तिथे, तो तृप्त झाला असेल.

 

- गो. नि. दांडेकर

 

(मुंबई सकाळ दिनांक ३ मार्च १९८८ यांच्या सौजन्याने)